Wednesday, June 10, 2009

Indian mind & Indian Mindset

(ऑल इंडिया मॅनेजमेंट्‌स असोसिएशनने लखनौ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केलेल्या भाषणाचा श्रीधर लोणी यांनी केलेला संक्षिप्त अनुवाद.)

गेल्या काही दिवसांपासून मी भारतीय विचारसरणी आणि मानसिकतेबद्दल माझं एक निरीक्षण मांडत आहे. मला वाटतं, की आपल्याकडे विचारसरणी आणि मानसिकता यांच्यात द्वंद्व आहे- संघर्ष आहे. इंग्रजीत मी त्याचं वर्णन "माईंड व्हर्सेस माईंडसेट' असं करतो. "इंडियन माईंड'- म्हणजे भारतीय विचारसरणी आपल्याला एकविसाव्या शतकात नेतेय, तर मानसिकता (माईंडसेट) मागे म्हणजे अगदी पंधराव्या किंवा चौदाव्या शतकात खेचू पाहतेय. विचार, द्रष्टेपणा यांच्या बाबतीत भारत कधीच मागं नव्हता. जागतिकीकरणामुळं जग छोटं होतंय- त्याचं रूपांतर "ग्लोबल व्हिलेज'मध्ये म्हणजे "वैश्‍विक खेड्या'त होत असल्याचं बोललं जातंय, ते खरंच आहे; पण वैश्‍विक खेड्याची संकल्पना सर्वांत आधी भारतानं मांडली- "वसुधैव कुटुम्बकम'च्या रूपानं. आपल्या संत ज्ञानेश्‍वरांनी "हे विश्‍वचि माझे घर' म्हटलं होतं. आता कुठं रुजू पाहत असलेली संकल्पना आपल्याकडे आठ शतकांपूर्वीच मांडली गेली होती. ज्या "इंडियन माईंड'बद्दल आपण बोलतोय, तो असा द्रष्टा आहे- व्यापक आहे. मात्र, आपली मानसिकता त्याला छेद देणारी आहे. आपण सारे एकाच कुटुंबातील आहोत, अशी भावना आपल्याकडे नेहमीच व्यक्त केली जाते; पण खरंच ते प्रत्यक्षात उतरतं? तुम्हाला माहितीय का, दोन जपानी माणसं एकत्र आली, की किती होतात? दोन! नाही. उत्तर आहे, अकरा! ते दोघं एकत्र आली, की संघबांधणीच्या दिशेनं प्रयत्न करतात, माणसं जोडतात. हा किस्सा एकाला सांगितल्यावर त्यानं मला विचारलं, की दोन भारतीय एकत्र आले, की किती होतात? उत्तर त्यानंच दिलं, शून्य! ही दोन्ही माणसं एकमेकांना छेद देतात- ते काही संघबांधणी करीत नाहीत. ही आहे भारतीय मानसिकता."इंडियन माईंड' आणि "माईंडसेट' यांच्यातला फरक हा असा आहे. "इंडियन माईंड'ला आकार देण्याची गरज नाही; परंतु "माईंडसेट'ला- मानसिकतेला आकार देण्याची, त्यात बदल घडवून आणण्याची गरज आहे. कारण चांगला विचार मांडणारे कितीही प्रज्ञावंत, कुशाग्र बुद्धिमत्तेचे, नीरक्षीरविवेक करणारे असले, तरी एकूणच समाजाची मानसिकता सकारात्मक, रचनात्मक आणि भविष्यवेध करणारी नसली, तर त्यांचा परिणाम फारसा होणार नाही. आजच्या एकविसाव्या शतकात आपल्याला एक प्रगत आणि सर्वार्थानं सशक्त देश म्हणून उभं राहायचं असेल, तर प्रथम मानसिकतेत बदल करावा लागेल.काही उदाहरणं पाहू यात. "गुरूः साक्षात परब्रह्म ! तस्मै श्री गुरुवे नमः' असं आपण म्हणतो; पण प्रत्यक्षात गुरूंना प्रतिष्ठा देतो का? पुण्यात भरलेल्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या उद्‌घाटन समारंभात अध्यक्षपदावरून बोलताना मी मला घडविलेल्या एका शिक्षकांची- भावे सरांची- छोटीशी गोष्ट सांगितली होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी त्याला उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर जेवताना, आज असे भावे सर कुठंच का दिसत नाहीत, यावर आम्ही बोलत होतो. त्या वेळी वाजपेयी म्हणाले, ""माशेलकरजी आपको पता है, ऐसा क्‍यो नहीं होता? इसका कारण ये है, की समाज में आज उनको प्रतिष्ठा नहीं है.'' दोनच वाक्‍यांत अटलजींनी नेमकं उत्तर दिलं होतं. एकीकडे आपली विचारसरणी गुरूला परब्रह्म मानणारी आहे; पण मानसिकता गुरूचा साधा मानही ठेवायला तयार होत नाहीए. विचारसरणी आणि मानसिकता यांच्यातील द्वंद्व हे असं आहे.माझे गुरूविषय चांगल्या शिक्षकांचा- गुरूंचा निघाला आहे. त्यामुळे माझ्या काही गुरूंबद्दल सांगायला हवं. त्यांनी मला घडवलं, प्रेरणा दिली. माझी सर्वांत मोठी गुरू म्हणजे माझी आई. मी अतिशय गरीब कुटुंबात जन्मलो. वयाच्या सहाव्या वर्षी पितृछत्र हरपलं. त्यानंतर आई मला घेऊन मुंबईला आली आणि अतिशय परिश्रम घेत तिनं मला शिक्षण दिलं. मी शाळेत अनवाणी जायचो. रस्त्यांवरील दिव्याखाली अभ्यास करीत असे. एक वेळ अशी होती, की शाळेची 21 रुपये फी भरण्याइतपत पैसेही आमच्याकडे नव्हते. उसनवारी करून आईनं हे पैसे जमवले. त्या वेळी अकरावीला बोर्डाची परीक्षा होत असे. मी बोर्डात अकरावा आलो; पण पुढील शिक्षणासाठी पैसे नव्हते. त्यामुळे शिक्षण सोडून नोकरी करण्याच्या विचारात मी होतो; मात्र सर दोराब टाटा ट्रस्टची दरमहा साठ रुपयांची शिष्यवृत्ती मला मिळाली. त्यामुळे मला पुढील शिक्षण घेता आलं. आज मी टाटांच्या संचालक मंडळावर आहे. याच उद्योगसमूहाची शिष्यवृत्ती घेण्यासाठी मी पूर्वी जिथं जायचो तिथं आता संचालक म्हणून जातोय. हा बदल होण्यास मधली चाळीस वर्षं लागली. हे सारं माझ्या आईमुळं घडलं. दुसरे गुरू म्हणजे प्रिन्सिपल भावे सर. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत. बहिर्गोल भिंगाचं नाभीय अंतर कसं काढायचं हे सांगण्यासाठी त्यांनी आम्हाला एकदा वर्गाबाहेर नेलं. त्यांनी एका हातात कागदाचा कपटा धरला होता. त्यावर त्यांनी भिंग धरलं आणि त्याची प्रखरता कागदावर येईल अशा प्रकारे ते वरखाली हलवलं. एका विशिष्ट क्षणी तो कागद जळू लागला. नाभीय अंतर सांगतानाच ते मला म्हणाले, ""माशेलकर, जर एका विशिष्ट ध्येयानं तू तुझ्यातील ऊर्जा वापरल्यास तू नक्कीच यशस्वी होशील.'' ही गोष्ट मी अनेकदा सांगतो. हार्वर्ड एमआयटीमध्ये- जिथं मी व्हिजिटिंग प्रोफेसर आहे- तिथंही ती एकदा सांगितली आणि म्हणालो, की जगाला अशा "कॉनव्हेक्‍स लेन्स लीडरशीप'ची गरज आहे.
माझ्यावर ज्यांचा विलक्षण प्रभाव आहे, असे तिसरे शिक्षक म्हणजे प्रा. एम. एम. शर्मा. वयाच्या २८ व्या वर्षी ते केंब्रिजमधून भारतात परतले होते. मुंबई विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान विभागात (यूडीसीटी) ते शिकवत. मी तिथंच शिकत होतो. त्या पुढील शिक्षणासाठी मला अमेरिका, कॅनडा आदी देशांतील विद्यापीठांमधून "ऑफर्स' आल्या होत्या; मात्र प्रा. शर्मांमुळे मी "यूडीसीटी'मध्येच राहिलो. त्यांच्याच हाताखाली "पीएच.डी.' केली. काही वर्षांपूर्वी मला "रॉयल सोसायटी'ची फेलोशिप मिळाली. अशा प्रकारची फेलोशिप मिळविणारा मी तिसरा केमिकल इंजिनिअर ठरलो. पहिला मान प्रा. शर्मा यांना मिळाला होता. अशा प्रकारे "रॉयल सोसायटी'चे फेलो असलेली आमची गुरू- शिष्याची जोडी आगळीच आहे.
चौथे गुरू म्हणजे प्रा. सी. एन. आर. राव. प्रा. राव हे भारतातील सर्वाधिक नावाजलेले शास्त्रज्ञ आहेत. ते माझ्यासाठी आदर्श आहेत- "रोल मॉडेल' आहेत. "नोबेल' वगळता त्यांना सर्व प्रमुख पारितोषिके मिळाली आहेत. ते नेहमीच अत्युत्कृष्टतेचा ध्यास धरतात. कितीही मोठे पारितोषिक मिळाले, पुरस्कार मिळाला, तरी त्यांची प्रतक्रिया ठरलेलीच- "नॉट बॅड'! या "नॉट बॅड'बद्दल मी एकदा त्यांना छेडलं. त्यावर त्यांनी "लिमिटलेस लॅडर ऑफ एक्‍सलन्स'ची संकल्पना मांडली. म्हणाले, "उत्कृष्टतेची शिडी अमर्याद असते!''संस्थात्मक मानसिकतातर ही "लिमिटलेस लॅडर ऑफ एक्‍सलन्स'ची मानसिकता आपल्याकडे रुजायला हवी. आपल्या क्षमतेइतकीच नव्हे, तर त्याहून अधिक चांगली कामगिरी करता येणं शक्‍य आहे. हा विश्‍वास जेव्हा एखाद्या संस्थेत निर्माण होतो, तेव्हा संस्थात्मक मानसिकतेत बदल झालेला असतो. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) असा बदल होताना मी पाहिलंय.
१९८९ ते १९९५ या काळात मी या संस्थेचा संचालक होतो. रसायनशास्त्रातील ही एक विख्यात प्रयोगशाळा आहे. उत्प्रेरकं, पॉलिमर्स आणि अन्य काही क्षेत्रांत "एनसीएल'नं आपलं असं स्थान निर्माण केलंय. मी ज्या वेळी संचालक बनलो, त्या वेळी एक वेगळंच आव्हान माझ्यासमोर होतं. प्रगत देशांतील प्रयोगशाळांच्याही पुढं जाऊन "एनसीएल'नं एखादी गोष्ट केल्यानंतर औद्योगिक क्षेत्रांकडून एक प्रश्‍न हमखास यायचा, "त्यांनी हे केलंय काय?'' त्यांनी म्हणजे जपान, अमेरिका, युरोप. मी मलाच प्रश्‍न विचारू लागलो, "मी काय विकतो आहे?'' उत्तर मिळालं- ज्ञान. पुढचा प्रश्‍न होता, "माझी बाजारपेठ कोणती?'' मीच उत्तरलो, "जागतिक.'' त्यानंतर आम्ही राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेला आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा बनविण्याची खूणगाठ मनाशी बांधली. कारण तसं झालं तरच जागतिक बाजारपेठ आम्हाला खुली होणार होती.
अमेरिकेतल्या "फायझर'ला, "जनरल इलक्‍ट्रिक'ला (जीई) आमचं संशोधन विकण्याची स्वप्नं आम्ही पाहू लागलो. 1989 मध्ये असं करणं जरा धाडसाचं होतं. अनेकांनी भुवया वर केल्या; शंका उपस्थित केल्या; पण क्षमतेच्या पलीकडे जाण्याचा ध्यास आम्ही घेतला आणि त्यात आम्हाला यश येत गेलं. "जीई'मध्ये विकलं जाऊ शकेल असं संशोधन "सॉलिड स्टेट पॉली कंडेन्सेशन ऑफ पॉलिकार्बोनेट्‌स' विकसित केलं गेलं आणि एक मोठं परिवर्तन घडलं. त्यानंतरच आम्ही पेटंटचाही ध्यास घेतला. कारण तोपर्यंत आम्ही पेटंटचा गांभीर्यानं विचारच करीत नव्हतो. यामुळं "जीई' आणि "एनसीएल' जवळ आले आणि एका अविश्‍वसनीय प्रवासाची सुरवात झाली. त्यानंतर "जीई'चे "सीईओ' जॅक वेल्च यांनी असा प्रश्‍न केला, की जर ते (भारतीय) इतकं चांगलं संशोधन करीत असतील, तर मग भारतात का जायला नको? झालं. मग "जीई'नं बेंगळुरूमध्ये संशोधन (आर अँड डी) केंद्र सुरू केलं. पाठोपाठ अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची संशोधनकेंद्रं भारतात येत गेली. आज तीनशेहून अधिक कंपन्यांची "आर अँड डी' केंद्रं भारतात आहेत आणि हजारो भारतीय शास्त्रज्ञ त्यांमध्ये संशोधन करीत आहेत. हे तेच शास्त्रज्ञ आहेत, ज्यांच्याबद्दल एके काळी "रिव्हर्स इंजनिअरिंग' (म्हणजे अन्य देशांतील संशोधनाची भ्रष्ट नक्कल करणारे) असा शब्दप्रयोग केला जायचा. मात्र, आता असं कुणी म्हणत नाही. मानसिकतेतील बदलामुळे हे होऊ शकलं. आपली प्रतमाच बदलली गेली.राष्ट्रीय मानसिकताहे झालं संस्थात्मक मानसिकतेतील बदलाबद्दल. आता राष्ट्रीय मानसिकतेचा विचार करू यात. आपली राष्ट्रीय मानसिकता कशी आहे? १९४७ मध्ये आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं. ते आपलं पहिलं स्वातंत्र्य होतं. दुसरं स्वातंत्र्य मिळालं १९९१ मध्ये- डॉ. मनमोहनसिंग यांनी उदारीकरणाचं धोरण आणल्यानंतर. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेतच नव्हे, तर एकूणच मानसिकतेत मोठा बदल झाला आहे. गेल्याच आठवड्यात "टाटा'नं आपली लाख रुपयांत मिळू शकेल, अशी "नॅनो' कार बाजारात आणली. त्यासाठीची नोंदणी आता सुरू झालीय.
आपल्या स्वतःची मोटार असावी, हे सर्वसामान्यांचं स्वप्न "नॅनो'मुळं साकारलं जाणार आहे. आज जगात कुठंही गेलात तरी टाटांच्या "नॅनो'बद्दलची कुजबूज ऐकू येईल. एक लाख रुपयांत कार? कसं शक्‍य आहे? टाटांनी ते शक्‍य करून दाखवलंय. तेही सर्व परिमाणं आणि निकष पाळत. प्रतकूलतेवर मात करत. हे एक अविश्‍वसनीय यश आहे. अशक्‍य बाबही साध्य करून दाखविणारी ही मानसिकता. १९९१ पर्यंत देशात नियंत्रित अर्थव्यवस्था होती. त्यामुळे स्पर्धात्मकता नव्हती. अनेकांना आपले हात बांधले असल्याचं त्या वेळी वाटे. अर्थव्यवस्था खुली झाली आणि नवे वारे वाहू लागले. उद्योगांमध्ये स्पर्धा वाढली.
उद्योजक त्यांच्या क्षेत्राचा विस्तार करू लागले. ट्रक बनविणाऱ्या टाटा कंपनीनं प्रथम "इंडिका' मोटार बाजारात आणली. पन्नास वर्षांपूर्वी "ब्रिटिश मॉरीस ऑक्‍सफर्ड' गाडी "ऍम्बेसेडर' बनून भारतीय रस्त्यांवर धावायची. आज लंडनच्या रस्त्यांवर भारताची "इंडिका' "सिटी रोव्हर' बनून धावत आहेत- आणि "टाटा' कंपनी "लॅंड रोव्हर' आणि "जॅग्वार' ताब्यात घेत आहे. हा केवळ काळातला बदल नाहीये; राष्ट्रीय मानसिकतेतील बदल आहे. जमशेटजी टाटांना जेव्हा पोलाद कारखाना उभा करायचा होता, तेव्हा एका बिटिश गृहस्थानं म्हटलं होतं, "तुम्ही जर पोलाद बनविणार असाल, तर तुम्ही बनविलेला प्रत्येक पौंड पोलाद मी खायला तयार आहे!'' भारतीय माणसाबद्दलचा केवढा हा अविश्‍वास; पण आपला शब्द खरा करायचं त्या गृहस्थानं ठरवलं असतं, तर त्याला अपचनच झालं असतं! आज याच टाटांनी "कोरस' ही ब्रिटिश पोलाद कंपनी ताब्यात घेतलीय. आता आपण खुद्द ब्रिटनमध्येच पोलाद बनवितोय. राष्ट्रीय मानसिकतेतील बदलाचं हे आणखी एक उदाहरण.अशा रीतीनं एक नवा बदल देशात दिसून येतोय. तो पूर्णांशानं झालेला नसला, तरी त्याची फळं दिसू लागली आहेत. त्यांकडे सकारात्मकतेनं पाहायला हवं- आणि आशावाद जपायला हवा. मी स्वतः आशावादी आहे- दुर्दम्य आशावादी. अर्धा रिकामा असलेला पेला मला कुणी दाखवला तर मी त्यातल्या अर्ध्या भरलेल्या भागाकडं पाहीन. मी जर अंधारात गेलो, तर अंधाराला दूषणं देण्याऐवजी मेणबत्ती शोधेन. आशावाद हा असा असायला हवा. त्याला द्रष्टेपणाची, परिश्रमांची जोड दिली, की अशक्‍यप्राय गोष्ट शक्‍य करून दाखवता येते. भारतीयांच्या मानसिकतेत असा बदल घडवून आणणं गरजेचं आहे.भारत आणि चीनभारत आणि चीन या दोहोंची तुलना केली जाते. दोन्ही देश वेगानं आर्थिक विकास घडवून आणत आहेत. दोघांमध्ये एक अघोषित स्पर्धाच जणू चालू आहे. या स्पर्धेत कोण विजयी होईल, असा प्रश्‍न बहुतेक जण विचारतात. त्यावर माझं उत्तर ठरलेलं आहे - भारत. याचं साधं कारण म्हणजे भारत हा "लंबी रेस का घोडा' आहे. थोड्याच अंतरासाठी वेगानं धावणाऱ्यांपैकी तो नाही. भारताकडे तीन वैशिष्ट्यपूर्ण बाबी अशा आहेत, की ज्याचा त्याला या दीर्घकालीन स्पर्धेसाठी फायदा होणार आहे. या तीन बाबी म्हणजे लोकशाही, लोकसंख्या आणि विविधता. इंग्रजीत यांचं वर्णन मी तीन "डी' असं करतो. कारण या तिन्ही शब्दांची सुरवात "डी'नं होते. आपल्या लोकशाहीबद्दल- "डेमॉक्रसी'बद्दल- वेगळं सांगायलाच नको. सध्याच्या निवडणुकांद्वारा आपण त्याचा अनुभव घेतच आहोत. या लोकशाहीत काही दोष असतील; पण लोकांनाच सर्वशक्तिमान मानणारी ही पद्धत देशाच्या प्रगतीला पूरक आहे. दुसरी बाब आहे- लोकसंख्या- डेमॉग्राफी. आपल्या प्रचंड लोकसंख्येच्या ओझ्याबद्दल खूप काही बोललं जातं; परंतु या लोकसंख्येमुळंच जगातील सर्वाधिक तरुण भारतात आहेत. भारत हा तरुणांचा देश आहे.
देशातील निम्म्याहून अधिक लोक पंचविशीच्या आतील आहेत. शांघायमध्ये पुढील पाच वर्षांत तेथील एक तृतीयांश लोकसंख्या साठीच्या पुढं जाईल. कारण चीनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून "एक मूल' धोरण राबविलं जातंय. तरुण हे देशाचे आधारस्तंभ असतात. ते देशाला कार्यक्षम मनुष्यबळ पुरवतात आणि नावीन्यपूर्ण कल्पनाही राबवतात. म्हणूनच हे तरुण भारताचे आशास्थान आहेत. तिसरी बाब आहे वैविध्याची- "डायव्हर्सिटी'ची. भाषा, संस्कृती, वेशभूषा अशा अनेक गोष्टींत आपल्याकडं वैविध्य आहे; तरीही त्यात समानतेचा धागा आहे. लोकशाही, लोकसंख्या आणि विविधता या तीन "डीं'मुळे आपण चीनच्या पुढं जाऊ शकू; परंतु काहीही न करता केवळ ही तीन वैशिष्ट्यं जपत बसलो, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यासाठी आणखी तीन बाबींचा आधार घ्यावा लागेल. त्या म्हणजे टॅलेंट (प्रज्ञा), टेक्‍नॉलॉजी (तंत्रज्ञान) आणि टॉलरन्स (सहिष्णुता). हे आहेत तीन "टी'. भारतीय प्रज्ञेबद्दल बोलायला नको. भारत ही प्रज्ञावंतांची खाण आहे. गरज आहे, ती या प्रज्ञावंतांना हेरून त्यांना घडविण्याची, दिशा देण्याची.
प्रगत देशांचा इतिहास आपण अभ्यासला पाहिजे. मग लक्षात येईल, की या देशांनी काहीतरी वेगळं करून दाखवलं आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेनं रस्ते आणि रेल्वेच्या बाबतीत, ब्रिटननं वस्त्रोद्योगात, डेन्मार्कनं दूध आणि दुग्धजन्य पदार्थांत, स्वीडननं टिंबरमध्ये, पश्‍चिम आशियानं तेलामध्ये आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. भारत कशात वेगळंपण सिद्ध करेल? त्यावर माझं उत्तर आहे, "आयटी'. आणि "आयटी' म्हणजे "इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी'- माहिती तंत्रज्ञान नाही. मी ज्याला "आयटी' म्हणतोय, ती आहे, "इंडियन टॅलेंट'- भारतीय प्रज्ञा. या देशातील प्रज्ञावंत तरुणच उद्याच्या उज्ज्वल भारताचे शिल्पकार आहेत.तंत्रज्ञान अर्थातच महत्त्वाचं आहे. याही क्षेत्रात भारतानं आपला ठसा उमटवलाय. अवकाश तंत्रज्ञान, अणुतंत्रज्ञान ही त्याची ठळक उदाहरणं. मात्र, मी येथे वेगळाच मुद्दा मांडतोय. तो हा, की तुम्ही तंत्रज्ञान किती परिणामकारकतेनं वापरता?
पुण्यातच हिंजवडीत "टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस'- "टीसीएस'- आहे. या कंपनीनं जगातील चौथ्या क्रमांकाचा वेगवान महासंगणक विकसित केलाय. तेथील ऐंशी तरुणांनी ही करामत केलीय. ही झाली शिखरावरची कामगिरी. आता पायथ्याची कामगिरी पाहू यात. याच "टीसीएस'नं निरक्षरांना संगणकाच्या साह्यानं साक्षर करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलंय. सहा ते आठ आठवड्यांत निरक्षरांना वर्तमानपत्र वाचण्याइतपत साक्षर होता येतं. यासाठी प्रत्येकी खर्च येतो शंभर रुपये. आंध्र प्रदेशातील मेडक जिल्ह्यात याबाबतचा प्रयोग यशस्वी झालाय- आणि आता तो दक्षिण आफ्रिकेतही राबविला जातोय. जर आपण हा संगणकआधारित साक्षरता कार्यक्रम देशव्यापी केला, तर पाच वर्षांत संपूर्ण देश साक्षर होईल. त्यासाठी वीस वर्षं नाही लागणार. प्रज्ञेच्या साह्यानं तंत्रज्ञान विकसित करणं आणि ते तंत्रज्ञान परिणामकारकतेनं वापरणं या दोन्ही बाबी या उदाहरणांतून स्पष्ट होतात.शोधकांच्या शोधातसरतेशेवटी मी सांगणार आहे, इनोव्हेशन, पॅशन आणि कम्पॅशन यांबद्दल. या तीन बाबी म्हणजे सत्यम्‌, शिवम्‌ आणि सुंदरम्‌च जणू. इनोव्हेशन म्हणजे नवता, सर्जकता. पॅशन म्हणजे एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन झपाटल्यागत काम करणं आणि कम्पॅशन म्हणजे दयाळूपणा, कनवाळूपणा. सर्जनशील असलेले, नावीन्याचा ध्यास घेतलेले, काहीतरी नवं करू पाहणारे, धडपडणारे लोक आपल्याकडे कमी नाहीत. त्यांचा शोध घेतला गेला पाहिजे. याच हेतूनं आम्ही सन २००० मध्ये "नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन'ची स्थापना केली. कुणासाठी तर तळागाळातील नवशोधकांसाठी- इनोव्हेटर्ससाठी- म्हणजेच विविध कारागिरांसाठी, शेतकऱ्यांसाठी, शाळा अर्धवट सोडून छोटं-मोठं संशोधन करणाऱ्यांसाठी.
अहमदाबादच्या "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट'मधील अनिल गुप्तांसारखा द्रष्टा माणूस या शोधमोहिमेचं नेतृत्व करतोय. खुद्द त्यांनीच "शोध यात्रा'ही काढल्या. नवशोधकांसाठी स्पर्धा आयोजित केल्या. त्यांना अतिशय उत्साहवर्धक प्रतसाद मिळतोय. आपल्याकडे प्रज्ञावंत कमी नाहीत, शोधक वृत्ती असणारे कमी नाहीत आणि क्षमता असलेले कमी नाहीत. गरज आहे, ती त्यांच्यापर्यंत जाण्याची. हे काहीसं हनुमानासारखं आहे. जांबुवतांनी लक्षात आणून दिल्याखेरीज हनुमानाला आपल्या अमर्याद शक्तीची कल्पनाच नव्हती. आपल्याकडे असे १.२ अब्ज हनुमान आहेत. जेव्हा त्यांना त्यांच्या शक्तीची, क्षमतेची कल्पना येईल, तेव्हा आपण काय करू?
नक्कीच भव्यदिव्य कामगिरी करू आणि जगात भारताला त्याच्या योग्यतेचं स्थान मिळवून देऊ शकू. "माईंड' आणि "माईंडसेट' यांच्यातील द्वंद्वही तेव्हाच संपुष्टात येईल. चला मग मानसिकता बदलू या.